ह्या झाडाची पाने दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून वाटतात. तसेच ह्याच्या पानाच्या विड्या करून त्या ओढतात. लघ्वीचे वेळी कळ येत असेल, लघ्वी अडून तुंबली असेल, किंवा लघ्वीचे वेळी तिडीक येत असेल, तर आपट्याचे पानांचा रस २० ग्रॅम काढून त्यात दूध व साखर तितकीच घालून दिवसातून वयोमानाप्रमाणे चार वेळा द्यावा. लघवी साफ सुटून सर्व विकार थांबतात.
लघ्वीतून खर पडत असेल तर याचे कोवळे कोवळे तुऱ्यांचा किंवा पानांचा रस काढून वरीलप्रमाणे सांजसकाळ द्यावा, खर जाणेची थांबते. गंडमाळा, गंडरोग, गलगंड व कंठरोग तसेच व्रणास आपट्याच्या ४० ग्रॅम सालीचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा मंदाग्नीवर शिजवून आणि तो मध घालून (वयोमानाप्रमाणे) प्यावा. ग्रंथीवर व व्रणावर आपट्याची साल बांधावी. गंडमाळा व गळ्याचे व्रण बरे होतात. विंचू चावला असे ऐकल्याबरोबर ह्या झाडाची दोन पाने, खाली धरून खुडावी व ज्याला विंचू चावला असेल त्याच्या चावलेल्या जागेवरून खाली फिरवीत जावी.
विंचू उतरतो असे म्हणतात. तसेच गरोदरबाई अडली असेल तर आपट्याचे झाडास नमस्कार करून, मुंज झाली नाही अशा मुलाकडून अगर लग्न झाले नाही अशा कुंवारीकडून याची पाने काढून ती गरोदर बाईचे अंगावर फिरवावी. ताबडतोब प्रसूत होते असे म्हणतात. याचे पानांचा रस निघत नाही म्हणून पाणी घालून तो वाटून काढावा.
शेंगा मूत्रल आहेत. पाण्यात उकळून साखरेबरोबर दिवसातून दोन तीन वेळ प्यायल्याने लघ्वीस साफ होते. मुळाचे सालीचा क्वाथ काळजास आलेली सूज ओसरण्यास मदत करतो. मुळाची साल १० ग्रॅम दोन पेले पाण्यात उकळणे. अर्धा पेला बाकी राहिल्यावर उतरवणे. गाळून पिणे. मधाबरोबर त्याची सुकी काळी फुले १० ग्रॅम साखरेबरोबर घेतल्यास मुरडा बरा होतो. बी जीवाणूंचे दंशावर चोपडल्यास बरे वाटते. कृमिवर पण उपयोगी आहे.
: लेखक:
कै. वैद्यतीर्थ आप्पाशास्त्री साठे
आयुर्वेद भवन, काकडवाडी, मुंबई ४.


